श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वार्षिकांकाला द्वितीय पारितोषिक प्रदान
शेगाव: श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वार्षिकांकाला संत गाडगे बाबा अमरावती विद्यापिठ, अमरावती च्या वार्षिकांक स्पर्धेत शहरी विभाग व्यावसायिक गटामधून द्वितीय पारितोषिक प्रदान करण्यात आले. विद्यापीठात १ मे ला आयोजित करण्यात आलेल्या बक्षीस वितरण समारंभामध्ये मा. कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह देऊन महाविद्यालयाचा गौरव करण्यात आला. महाविद्यालयाच्या वतीने प्रा. सचिन भगत यांनी पारितोषिक स्विकारले. या स्पर्धेत वार्षिकांकाचे मुखपृष्ठ, अंतर्गत सजावट, छपाई व बांधणी, लिखाणाची नाविन्यता व वाचनीयता ई. च्या आधारावर उत्कृष्ट वार्षिकांकाची निवड पारितोषिकासाठी केली जाते. महाविद्यालयाचा वार्षिकांक “तत्त्वदर्शी” या नावाने दरवर्षी प्रकाशित केला जातो. यात विद्यार्थ्यांचे ईंग्रजी, मराठी, आणि हिंदी भाषेत दर्जेदार लेख, कविता, कथा, विविध विभागांचे अहवाल ई. तसेच छायाचित्रण, व्यंगचित्रे, रेखाचित्रे यांचा समावेश आहे. वार्षिकांकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या साहित्यिक कला-गुणांना वाव मिळतो. त्यांना व्यक्त होण्याची संधी मिळते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालय सातत्याने प्रयत्नशील असते आणि विद्यार्थ्यांना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देत असते. आदरणीय संचालक, प्राचार्य, विभागप्रमुख, प्राध्यापक आणि कर्मचारी यांनी वार्षिकांक तयार करणाऱ्या टीमचे अभिनंदन केले.