“शिक्षण हेच भविष्य”- डॉ. रघुनाथ माशेलकर

शेगाव: “भारतीय शिक्षण, संशोधन आणि नवनिर्मितीचा नव्याने शोध” या विषयावर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी एआयसीटीई डिंस्टिग्विश्ड चेअर प्रोफेसर योजनेंतर्गत श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय, शेगाव येथील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधला. शुक्रवार, दिनांक ८ ऑक्टोबर २०२१ रोजी गुगल मिट या ऑनलाइन प्लेटफॉर्मद्वारे या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
शिक्षण हेच भविष्य या बाबत बोलताना त्यांनी सांगितले की त्यांची स्वतःची आणि दिवंगत राष्ट्रपती के.आर. नारायणन यांची सुरुवातीला हलाखीची आर्थिक परिस्थिती होती व ते टाटा ट्रस्ट कडून मिळालेल्या शिष्यवृत्तीमुळे उच्च शिक्षण घेऊ शकले. कालांतराने नारायणन राष्ट्रपती झाले आणि त्यांच्या हस्ते टाटा समूहाचे रतन टाटा व त्यांना पद्मभूषण सन्मान प्रदान करण्यात आला. त्यांनी हे उदाहरण सांगून शिक्षणाची शक्ती सिद्ध केली. विज्ञानाचा उपयोग मानव जातीच्या कल्याणासाठी व्हावा या महात्मा गांधींच्या विचारातून प्रेरणा घेऊन त्यांनी गांधीवादी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाची संकल्पना मांडली. “गांधीजी नेहमी म्हणत असत, निसर्ग सर्वांच्या गरजा भागवण्यास समर्थ आहे, पण तो सर्वांची हाव भागवू शकणार नाही. गांधींजींच्या या विचारातून प्रेरणा घेऊन लोकांना भेडसावणाऱ्या समस्या आपण सोडवायला हव्या असं मला वाटलं,” असं माशेलकर सांगतात.
दोन वर्षे सातत्यानं यावर चिंतन केल्यावर त्यांनी आणि सी. के. प्रल्हाद यांनी मिळून गांधीवादी अभियांत्रिकीवर एक प्रबंध सादर केला. हा प्रबंध हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यूमध्ये 2010 साली प्रसिद्ध झाला. “कमीत कमी साधनसंपत्तीचा वापर करून जास्तीत जास्त लोकांचं कल्याण होईल, अशी उत्तम कामगिरी करणं,” हे गांधीवादी अभियांत्रिकीचं सार आहे असं त्यांनी नमूद केलं.
आपल्या व्याख्यानात त्यांनी पाच माशेलकर मंत्र सांगितले. ते असे:
• आकांक्षा तुमच्या शक्यता आहेत.- तुमच्या आकांक्षा उंच असल्या तरच त्या पूर्ण करण्याची शक्यता जास्त आहे.
• शांतपणाने कठोर परिश्रम करा, आपोआपच यशाचा मोठा आवाज येईल. यश कॉफी सारखे तात्काळ मिळत नाही.
• हेतू, चिकाटी आणि आवड. विजेते कधीही हार मानणारे नसतात आणि हरणारे कधीही विजेते नसतात. फेल म्हणजे “फर्स्ट अटेम्प्ट इन लर्निंग”.
• ज्यावेळी इतर सर्व दारे बंद होतील, त्यावेळी तुम्ही स्वतःचे ‘व्दार’ तयार करा.
• मानवी कल्पनाशक्ती, मानवी कामगिरी, मानवी सहनशक्ती यांना कोणतीही मर्यादा नाही. दररोज सकाळी, मग तुम्ही १८ वर्षांचे असो की ८० , माझे उत्कृष्ट अजून यायचे आहे आणि कदाचित आज ते येईल असे म्हणा.
या व्याख्यानासाठी महाविद्यालयाचे संचालक, प्राचार्य, प्राध्यापक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published.