राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या विषयावर व्याख्यान
शेगाव: भारतीय शिक्षण मंडळाचे अ.भा. संघटन मंत्री श्री. मुकुल कानिटकर यांचे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण–2020 यामध्ये शिक्षकांची भूमिका या विषयावर व्याख्यान महाविद्यालयाच्या नवीन सेमिनार हॉल मध्ये आयोजित करण्यात आले होते. श्री. गजानन शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी श्री. शरदजी शिंदे यांनी श्री. मुकुल कानिटकर यांचे स्वागत केले.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 बाबत बोलताना त्यांनी या धोरणाची अंमलबजावणी करताना शिक्षकांची भूमिका कशी असेल यावर प्रकाश टाकला.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा आढावा घेताना कानिटकर यांनी मातृभाषेतून शिक्षण,भारतीय ज्ञान परंपरा, संशोधन, लवचिकपणा आणि सर्व समावेशकता या पाच बिंदूंवरसखोल विचार मांडले. जपान, चीन, जर्मनी या विकसित देशांनी आपल्या मातृभाषेतून शिक्षण देण्याची प्रकिया केल्यामुळे त्यांचा विकास होत आहे. ते स्वतःचे तंत्रज्ञान स्व-भाषेतून विकसित करीत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे विकसित होणारे तंत्रज्ञान इतर देशांना घेता आले नाही. ही दृष्टीसमोर ठेऊन आपणही मातृभाषा समृद्ध करणे आवश्यक आहे असे त्यांनी नमूद केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये शिक्षकांची भूमिका खूप महत्वपूर्ण आहे. शिक्षकाशिवाय अंमलबजावणी शक्य नाही. शिक्षक ऐकतो, तक्रार करत नाही. जेव्हा शिक्षक तक्रार करतो तेव्हा समाजाचे पतन होते. शिक्षकाला धैर्य पाहिजे. शिक्षकांसमोर फक्त आव्हाने असतील समस्या नाही. असेही त्यांनी आपल्या व्याख्यानात नमूद केले.
सदर चर्चासत्रात सहभागी झालेल्या शिक्षकांनी आपले प्रश्न मांडले. त्यांनी त्यांच्या प्रश्नाला उत्तरे दिलीत. या प्रसंगी श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक श्री.श्रीकांत दादा पाटील, श्री गजानन शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी श्री. शरदजी शिंदे, प्राचार्य डॉ.एस. बि. सोमाणी, सरस्वती महाविद्यालयाचे डॉ. संतोष बोथे, श्री गजानन महाराज इंग्लिश स्कूल च्या प्रा. कविता पाटील आणि प्राध्यापक उपस्थित होते.