श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाचा एंड्रेस एंड हाऊजर लिमिटेड सोबत सामंजस्य करार
शेगाव- येथील श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयामधील यांत्रिकी अभियांत्रिकी विभागाने औरंगाबाद येथील स्विझर्लंडचा उद्योग समूह व कॉन्फिडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज, मराठवाडा झोनल कौन्सिलचे मुख्यालय असलेल्या “एंड्रेस एंड हाऊजर (इंडिया) ऑटोमेशन इंस्ट्रुमेंटेशन प्रा. लिमिटेड या समूहासोबत नुकताच सामंजस्य करार केला.
अभियांत्रिकीच्या क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असलेल्या श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयातील यांत्रिकी अभियांत्रिकी विभागाने औरंगाबाद येथे पार पडलेल्या एका सदिच्छा भेटीमध्ये हा करार घडून आला. अभियांत्रिकीचे शिक्षण हे सततच्या गुणवत्ता सुधारणेवर तसेच प्रात्यक्षिक अभ्यासावर अवलंबून आहे. त्यामध्ये नामांकित उद्योग समूह प्रामुख्याने वापरात असलेली नवनवीन अभियांत्रिकीची उपकरणे यांचे यथायोग्य अध्ययन जर विद्यार्थ्यांनी केले तर हेच विद्यार्थी भविष्यात अभियांत्रिकीच्या विश्वात मानव कल्याणासाठी उत्तमपणे कार्य करू शकतात आणि याच धरतीवर एंड्रेस एंड हाऊजर या उद्योग समूह सोबत महाविद्यालयातील यांत्रिकी अभियांत्रिकी विभागाने सामंजस्य करार घडवून आणला.
या करारात प्रामुख्याने विद्यापीठाने निर्धारित केलेले मेझरमेंट सिस्टम या विषयाचे प्रात्यक्षिके व त्यांचे औद्योगिक क्षेत्रे सद्यस्थितीत वापरत असलेल्या आधुनिक उपकरणांसोबत सांगड घालणे, सोबतच थर्मल अभियांत्रिकी च्या संशोधनात मदत करणे तसेच विभागातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे परस्पर प्रशिक्षण अश्या अनेक बाबी या सामंजस्य करारात समाविष्ट करण्यात आल्या. यापुढे ही हा उद्योग समूह महाविद्यालयामध्ये अनेक बाबींवर सहकार्य करणार आहे. या कराराच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना प्रशिक्षण तसेच उपलब्धतेनुसार रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे आदींवर उभयपक्षी कार्य होणार आहे.
एंड्रेस एंड हाऊजर या संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक श्री. श्रीराम नारायणन हे नुकतेच कॉन्फिडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज च्या महाराष्ट्र स्टेट कौन्सिलच्या चेअरमन पदी निवडून आल्याने त्यांचा यावेळी संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच कॉन्फिडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज ही विद्यार्थ्यांना आणि अभियांत्रिकी शिक्षणाला अजून कसा हातभार लावू शकेल यासंदर्भात चर्चा झाली. हा सामंजस्य करार प्रत्यक्षात आणण्यासाठी महाविद्यालयातील यांत्रिकी अभियांत्रिकी विभागाने अथक परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच तांत्रिक कौशल्य आत्मसात करण्यासाठी हा सामंजस्य करार निश्चितच मोलाचे योगदान देणारा ठरेल.