श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय, शेगावचा किर्दक ग्रुपच्या टूल टेक टुलिंग्स सोबत सामंजस्य करार!
शेगाव: श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय शेगाव चा कॉन्फिडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री चे सदस्य असलेल्या औंरगाबाद येथील नामांकित किर्दक ग्रुप च्या “टूल टेक टुलिंग्स” या अभियांत्रिकीच्या क्षेत्रात अव्वल कीर्ती असलेल्या उद्योग समूहासोबत नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. या करारामध्ये प्रामुख्याने अभियांत्रिकीच्या विविध पैलूंवर जसे कि विद्यार्थ्यांना प्रक्षिक्षण देणे तसेच तांत्रिक कौशल्य आत्मसात करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानावर आधारित प्रयोगशाळा विकसित करणे, त्यासाठी लागणारे तंत्रज्ञान पुरवणे, रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करणे आदी बाबींचा समावेश करण्यात आला आहे.
किर्दक ग्रुप चे व्यवस्थापकीय संचालक श्री सुनीलजी किर्दक यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित एका बैठकीमध्ये या करारावर उभयपक्षी चर्चा आणि स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. आजच्या स्पर्धेच्या युगात विज्ञान आणि तंत्रज्ञानासोबत प्रात्यक्षिक अनुभव असेल तर विद्यार्थ्यांना उत्तुंग भरारी घेता येते आणि त्यांचे भविष्य उज्वल होते आणि अश्या आणि यांसारख्या अनेक महत्वाच्या पैलूं वर हि संस्था गेल्या कित्तेक वर्षांपासून अविरतपणे काम करते आहे. सर्वे भवन्तु सुखिनः या ध्येय धोरणाला अनुसरून राष्ट्रनिर्माणासाठी उत्तम आणि संस्कारी मनुष्यबळ तयार करण्यासाठी संस्था अथक परिश्रम घेत असते. करार करताना टूल टेक टुलिंग्स चे मुख्य संचालन अधिकारी श्री. वैभव देशमुख सुद्धा प्रामुख्याने उपस्थित होते तर महाविद्यालयातर्फे यंत्र अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक उपस्थित होते.