श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयात क्रिकेट अकादमीचे उद्घाटन
शेगाव: श्री गजानन शिक्षण संस्थाव्दारा संचालित, श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय, शेगांव व मुंबई येथील क्रिकेटचे प्रसिध्द व नामांकित प्रशिक्षक श्री. सुलक्षण कुलकर्णी यांचे संयुक्त विद्यमाने क्रिकेट अकादमी स्थापन करण्यात आलेली आहे. या अकादमीचे उदघाटन गुरुवार, दिनांक २ डिसेंबर २०२१ ला मान्यवरांचे हस्ते करण्यात येईल.
युवा पिढीचा क्रिकेट खेळाकडे कल वाढत आहे. गुणवान क्रिकेटपटूंची संख्या मोठी आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंना योग्य संधी व सुविधा उपलब्ध होत नाहीत. अनेक खेळाडू आर्थिक कारणांनी मागे पडतात. त्यांना योग्य प्रशिक्षण व सुविधा उपलब्ध व्हाव्यात या हेतूने क्रिकेट अकादमी सुरू करण्यात आली आहे.
महाविद्यालयाच्या अतिभव्य आणि सर्व सोई-सुविधायुक्त क्रिकेट मैदानावर ही अकादमी सुरु होणार आहे. क्रिकेटचे अद्यावत प्रशिक्षण, शिबिरे, स्पर्धा वर्षभर सुरु राहणार आहेत. यामध्ये निवासी व अनिवासी अकादमी सुध्दा राहणार आहे. क्रिकेटपटूंसाठी लागणाऱ्या सर्व सुविधा अकादमीत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे नवोदीत खेळाडुंना संधी मिळणार आहे. या अकादमी मधुन राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, विद्यापीठ स्तरीय व शालेय स्तरीय वरील खेळाडु तयार होतील असा विश्वास प्रशिक्षक श्री सुलक्षण कुळकर्णी यांनी व्यक्त केला आहे.
याच दरम्यान दिनांक ०९-१२-२०२१ ते १२-१२-२०२१ पर्यंत सुलक्षण कुळकर्णी अकादमी, मुंबई व श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय, शेगांव तर्फे १४ वर्षाआतिल मुलांच्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यात मुंबई, अकोला, बुलढाणा, शेगांव, खामगांव येथील खेळाडु भाग घेणार आहेत व अंतिम सामना दिनांक ०५ डिसेंबर २०२१ ला खेळविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे संचालक व महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी केले आहे